महारराष्ट्रातील ९ वर्षीय ओमच्या ओटीपोटात ऑगस्ट २०२० मध्ये तीव्र वेदना होत असल्याची तक्रार त्याने केली. त्यावेळी त्याचे लहान आतडे पूर्णपणेच निष्क्रीय होणार आहे, याची कल्पनाही त्याच्या आई-वडिलांना नव्हती. स्थानिक रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याच्या लहान आतड्यात थ्रोम्बोसिस आणि मोठ्या प्रमाणावर गँगरीन झाल्याचे आढळले. त्यामुळे आतड्यांना रक्तपुरवठा कमी झाला व ते निष्क्रीय झाले. हा संसर्ग आणखी पसरू नये म्हणून तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आतडे काढून टाकल्यानंतर मुलाला पुढील उपचारांसाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. अँटीबॉडी टेस्ट आणि बॉवेल आरटी-पीसीआरद्वारे काढून टाकलेल्या अवयवात कोव्हिड संसर्ग दर्शवला गेला. महिनाभरापूर्वी मुलगा आणि त्याच्या वडिलांना कोव्हिड-१९ ची सौम्य लक्षणे दिसून ते पॉझिटिव्ह आल्याचे यातून कळले. ” थ्रोम्बोसिस आणि आतड्यांना संसर्ग होणे हे गंभीर कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये सामान्यपणे दिसून येते. मात्र मोठ्या प्रमाणावर आतड्यातील गँगरीन ही दुर्मिळ घटना असते, ” असे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे संक्रामक रोग तज्ज्ञ डॉ. राजीव सोमण सांगतात. ” अशा प्रकारची एकच घटना इटलीत घडली असून तिचा परिणाम गंभीर झााला. आपल्या देशातील घटनेत, आतड्यातील गँगरीनसह, ओटीपोटातही अनेक सौम्य संक्रमण होते- यामुळे ही केस गुंतागुंतीची होती.” संपूर्ण आतडे गमावल्यामुळे मुलाला काही खाता येत नव्हते. त्याला कृत्रिम पोषक घटकांवर ठेवण्यात आले होते. यालाच पॅरेंटल न्युट्रिशन असेही म्हणतात. त्याची प्रकृती अशक्त होती, कारण त्याच्या शरीरातील द्रव पदार्थ कमी होऊन इलेक्ट्रोलाइटमध्येही अडथळे निर्माण झाले होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे प्रमुख बालरोग चिकित्सक डॉ. परमानंद आंदनकर आणि पेडिअॅट्रिक गॅस्ट्रोंटेरोलॉजिस्ट डॉ. डिंपल जैन यांनी अतिशय हळुवारपणे या रुग्णावर उपचार केले. या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना, ज्युपिटल हॉस्पिटलचे मुख्य मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. गौरव चौबाल म्हणाले, ” या मुलाला कॅडव्हरीक स्मॉल इंटेस्टायनल ट्रान्सप्लांटसाठी सूचीबद्ध केले गेले होते. तो ३ महिने प्रतीक्षा यादीत होता. या काळात अन्न सेवन करण्याची तीव्र इच्छा होत होती, त्याच्या पॅरेंटल न्युट्रिशनमध्येही समस्या निर्माण होऊ लागल्या. हा वाट पाहण्याचा काळ मुलासाठी तसेच त्याच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता.” कॅडव्हरीक अवयवाची शक्यता दिसत नसल्याने जिवंत दात्यामार्फत लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाच्या शक्यतेबाबत कुटुंबासोबत चर्चा केली गेली. जिवंत दाता व्यक्ती त्याच्या आतड्यापैकी ४० टक्के भाग सुरक्षितरित्या दान करू शकतात. कारण उर्वरीत आतड्यात इतर प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची तसेच सामान्य पचन आणि शोषण क्रिया पूर्ण करण्याची क्षमता असते. मुलाच्या वडिलांनी त्यांच्या आतड्याचा एक भाग दान करण्यासाठी पुढे आले आणि पुढील तपासण्या केल्या गेल्या. ५ नोव्हेंबर रोजी चौबल यांच्या नेतृत्वात शल्य चिकित्सकाच्या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली. २०० सेमी आतडे कापले आणि वडिलांचा अवयव मुलाच्या शरीरात प्रत्यारोपित केला. डॉ. भाग्यश्री अर्भी यांनी अनेस्थेशिया दिला व ८ तासांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. दाता पूर्णपणे बरे झाले आहेत. मुलाची प्रकृतीदेखील सुधारत आहे. शस्त्रक्रियेनंतर ८ व्या दिवशी त्याने तोंडाने अन्न सेवन करण्यास सुरुवात केली. बालरोग तज्ज्ञ श्रीनिवास तांबे आणि पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलचे पेडिऍट्रिक गॅस्ट्रोंटेरोलॉजिस्ट डॉ. विष्णू बिरादार हे ऑपरेशननंतरची काळजी घेत आहेत. आतापर्यंत ज्युपिटल हॉस्पिटलमध्ये तीन लहान आतड्यांचे प्रत्यारोपण झाले असून पहिले मार्च २०२० मध्ये केले गेले. पश्चिम महाराष्ट्रात हे एकमेव केंद्र आहे, जिथे लहान आतड्यासंबंधी प्रत्यारोपण केले जाते. तसेच जिवंत दात्याकडून लहान आतडे घेऊन प्रत्यारोपण झालेले देशातील पहिले केंद्र आहे.
Courtesy: DailyHunt